घरांसाठी गिरणी कामगारांचे गणरायाला साकडे!

मुंबई, दि ५
गिरणी कामगार घरासांठी एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या नेत्यांनी काल नवसाला पावणा-या टाटा मिल कंपाऊंड मधील गणरायाला साकडे घातले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर यांनी शनिवारीच या बाप्पाचे दर्शन घेऊन कामगारांसाठी आराधना केली.
काल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने टाटा कंपाऊंड मधील सार्वजनिक गणेशो त्सव मंडळाच्या परळचा सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाचे दर्शन घेऊन,गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील विघ्न दूर व्हावे, यासाठी सामुदायिक दर्शन घेतले. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर नऊ जुलै रोजी आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानवर आंदोलन छेडुन इतिहास रचला होता. दिवसभरा च्या आंदोलनात सायंकाळी उद्योगमंत्री उदय सामंत,आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या शिष्टाईवर आंदोलन संस्थगित करण्यात आले.परंतु दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री (नगरविकास) एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बोलावलेल्या बैठकीत कामगारांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.आता उर्वरित घरे गिरणी कामगारांना मुंबईतच मिळाली पाहिजे, अध्यादेशातील घराचा हक्क डावलणारे कलम रद्द करा आणि उर्वरित घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, इत्यादी मागण्यांना सरकारने सकारात्मक पाठिंबा दिला होता. गणराया समोर सामुदायिक रित्या ‘होय महाराजा?”असे म्हणत विघ्नेश्वरा सरकारला घराच्या प्रश्नावरील सर्व मागण्या मान्य करण्याची सुबुद्धी दे! अशी गणरायासमोर प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी सर्वश्री निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर, इत्यादी नेत्यांबरोबर गिरणी कामगार सेनेचे बाळ खावणेकर,सर्व श्रमिक संघटनेचे संतोष मोरे, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने,गिरणी कामगार संघर्ष समिती आनंद मोरे,एनटीसी कामगार असोसिएशनचे बबन मोरे आदी मान्यवर कामगार नेते या प्रसंगी उपस्थित होते.गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी सर्व कामगार नेत्यांचे येथोचित स्वागत केले. या प्रसंगी संघाचे सर्व संघटन सेक्रेटरी, कार्यकर्ते, मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर पुढील कार्यक्रम ठरविण्यासाठी,परळ येथील रामिम संघ येथे सोमवारी दुपारी २.३० वाजता १४ कामगार संघटना नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. KK/ML/MS