सहावीतल्या चिमुरडीचा शाळेच्या गेटवरच हार्ट अटॅकने मृत्यू

नाशिक, दि. ६ : नाशिकमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या अवघ्या 12 वर्षांच्या विद्यार्थिनीचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. ती इयत्ता सहावीत शिकत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. मात्र शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असतानाच तिचा चक्कर आली. गेटसमोरच ती चक्कर येऊन खाली पडली होती.
शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या मुलीला हृदयाशी संबंधित आजार असल्याने तिला हृदयविकाराचा झटका आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रेयाचे मुळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील असून तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमधील हृदयविकाराच्या घटनांना आनुवंशिक आजार, तणाव, चुकीचा आहार, आणि कमी शारीरिक हालचाल यांसारखी कारणे असू शकतात. याबाबत जागरूकता आणि नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
SL/ML/SL