घाटकोपरमध्ये ११ एप्रिलला महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जल्लोष होणार

 घाटकोपरमध्ये ११ एप्रिलला महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जल्लोष होणार

मुंबई, दि ९- घाटकोपरमध्ये ११ एप्रीलला म.ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
तरुणांच्या सहभागातून जयंतीचा जल्लोष साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. यानिमित्ताने शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घाटकोपर रेल्वे पोलीस हॉकी ग्राउंड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती, महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे स्मरण, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. भिमोत्सव समिती, घाटकोपर यांच्या वतीने हा कार्यक्रम “जल्लोष जयंतीचा – मानवी मूलभूत हक्काचा” या संकल्पनेतून साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि संदेश उमप यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून सामाजिक संदेश देणारी विविध सादरीकरणेही होणार आहेत. ही माहिती मीडिया कोऑर्डिनेटर डॉ. विजय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती गेल्या अकरा वर्षांपासून मुंबईत तरुणांना सोबत घेऊन सामाजिक आणि वैचारिक प्रबोधनाचे कार्य करत आहे. समितीने २०१५ पासून आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यास सुरुवात केली असून १२५ वी जयंती बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जागतिक स्तरावर साजरी करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
यंदाचा जयंती उत्सव केवळ उत्सव न राहता “विचारांचा लोकोत्सव” म्हणून साजरा करण्याचा समितीचा संकल्प आहे. सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय यांचा संदेश तरुणांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या निमित्ताने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची सांगड घालत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच महाड येथील ऐतिहासिक पाणी हक्कासाठी झालेल्या महाड सत्याग्रहाची आठवण करून देत समाजात समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
समितीचे मार्गदर्शक म्हणून सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुनील कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण, प्रबोधनपर व्याख्याने तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे. “युद्ध नको, बुद्ध हवा” या संदेशातून शांतता, बंधुता आणि समतेचे विचार समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *