कोल्हापुरी चप्पलसाठी मिळाले भौगोलिक चिन्हांकन अर्थात जी. आय. टॅग

 कोल्हापुरी चप्पलसाठी मिळाले भौगोलिक चिन्हांकन अर्थात जी. आय. टॅग

कोल्हापूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना GI मानांकन देण्यात आलं आहे.आज ३२ हस्त कारागीरांना कोल्हापुरी चप्पलसाठी भौगोलिक चिन्हाकंन अर्थात जी. आय. टॅग प्रमाणपत्रं कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रदान करण्यात आली.

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे हस्तशिल्प विकास आयुक्तालय यांच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाचे संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच लिडकाॅम आणि करवीर हँडीक्राफ्ट प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त सहकाऱ्यांनं हा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हस्तशिल्प विकास आयुक्तालयाच्या कोल्हापूर कार्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग, लीडकॉमचे व्यवस्थापक विवेक चव्हाण आणि करवीर हँडीक्राफ्ट प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा अपर्णा चव्हाण आदी उपस्थित होते.

८०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा असणाऱ्या ह्या कलेला लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं. संपूर्णपणे हातानं बनविलेली कोल्हापुरी चप्पल आज सुबक आकार, वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आणि टिकावूपणा ह्यामुळे देशविदेशात प्रसिद्ध आहे.
हस्तकारागीरांच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पल बनविण्याची कला जिवंत ठेवत असतानाच GI नामांकनामुळे ह्या कारागीरांना आणि ह्या व्यवसायाला एक नवीन उभारी मिळणार आहे, असं जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी यावेळी सांगितलं. या माध्यमातून कोल्हापूरच्या या हस्तकारागिरांची कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचायला अधिक गती मिळणार आहे, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं.

कोल्हापूरची ओळख असणाऱ्या खास कोल्हापुरी चपलेला GI नामांकन (भौगोलिक चिन्हांकन) मिळालं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर इथं बनणाऱ्या कोल्हापुरी चप्पलला हे GI नामांकन प्राप्त झालं आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली हस्तशिल्प विकास आयुक्तालयच्या कोल्हापूर कार्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग, लीडकॉमचे व्यवस्थापक विवेक चव्हाण आणि करवीर हँडीक्राफ्ट प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा अपर्णा चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ३२ हस्तकारागीरांना कोल्हापुरी चप्पलसाठी भौगोलिक चिन्हाकंन अर्थात जी. आय. टॅग प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे.

आज ३२ कारागीरांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरुपात आतिश चव्हाण, दत्तात्रेय सातपुते, उमेश डोईफोडे, चंद्रकांत पोवार, केरबा कांबळे आदींंना जी. आय. टॅग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भौगोलिक चिन्हांकन अर्थात जी. आय. विषयी
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड तर्फे हे GI टॅग भारतातील वेगवेगळ्या भागातले खाद्यपदार्थ, हस्तकला आणि टेक्स्टाईल, कृषी उत्पादनं किंवा इतर कोणतीही अशी मानवनिर्मित वस्तू जी विक्रीसाठी उपलब्ध असते यांना दिला जातो.

ML/KA/SL

6 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *