गिरगाव येथील “गर्जना शाहिरांची” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि ३ : गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित “गर्जना शाहिरांची” या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि मुंबई संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत शाहीर, वादक, नृत्य आणि नाट्य कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती शशांक बामनोलकर यांनी केली, तर सूत्रसंचालन प्रतीक जाधव यांनी केले. श्रीनिवास नार्वेकर यांनी सादर केलेल्या कथावाचनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर अश्विनी कारंडे आणि गणेश कारंडे यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
आकांक्षा कदम यांच्या लावणीने आणि गणेश कारंडे व त्यांच्या ग्रुपच्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत आणली. या कार्यक्रमात आप्पा खामकर, निशांत शेख, दत्ताराम म्हात्रे, चंद्रकांत शिंदे, रामानंद उबाळे, निलेश जाधव आणि अविराज साळवी यांनी शाहिरी परंपरेचे दर्शन घडवले.
तेजस्विनी कारंडे, दीपिका मसुरकर, प्रीती दासगांवकर, नरेंद्र बेलोसे, रितेश गाड आणि सोमनाथ भुवड यांनी नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देत प्रेक्षकांवर अविस्मरणीय छाप सोडली. KK/ML/MS