गणेश चतुर्थी : त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि ! बुध्दी दे गणराया

 गणेश चतुर्थी : त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि ! बुध्दी दे गणराया

राधिका अघोर

सालाबादाप्रमाणे यंदाही सुरेख भाद्रपद महिन्यात श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सालाबादाप्रमाणे असं म्हणताना, खरं तर एक प्रकारच्या उपचाराची भावना असते. पण वर्षानुवर्षे येणारा गणेशोत्सव साजरा करण्यातला ताजेपणा गेली अनेक वर्षे तसाच अबाधित आहे, हे एक आश्चर्य आहे. मुंबई – पुण्यापासून ते थेट कोकण पट्ट्यात वैयक्तिक तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि अत्यंत भक्तीभावाने साजरा केला जातो.

श्रावण लागला की लोक गणपतीची तयारी, त्याची वाट बघणं, गावाला जाण्याची तयारी सुरू करतात. श्रावणातला शेवटचा सण पोळा संपला की भाद्रपद लागतो आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच विनायकी चतुर्थीला गणेश चतुर्थी असं म्हणतात. या काळात गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतात.

कोणाच्या घरी दीड, कुठे पाच, कुठे सात तर कुठे दहा दिवसांसाठी श्री गणेशाचे आगमन होते. गणपतीच्या पार्थिव मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली जाते. मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. घरच्या गणपती शिवाय, सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः मुंबई, पुण्यात, तर पारंपरिक सार्वजनिक गणेश मंडळे जगविख्यात आहेत. दरवर्षी अतिशय वाजत गाजत या गणपती बाप्पाची मिरवणूक निघते. दहा दिवस नुसते उत्साह, लगबग, दर्शनाच्या रांगांची गर्दी, याने भरलेले आणि भारलेले असतात. त्या खालोखाल नागपूर, नाशिक, संभाजीनगर अशा शहरात, इतकेच नाही तर देशभरात आणि जगभरात गणेशोत्सव साजरा केला जातो.

आज काळानुरूप या उत्सवाला थोडं व्यावसायिक आणि झगमगाटी स्वरूप आलं आहे. ह्या उत्सवामुळे एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होत असली तरी उत्सवातला साधेपणा आणि गोडवा कुठेतरी कमी होतो आहे.
गणपती लोकदेवता आहे. तो सर्व जनमानसाला एकत्र आणतो. मात्र त्याच वेळी तो बुध्दीदाताही आहे. त्याच्या त्या स्वरूपाचा आदर करत आपण हा उत्सव बिनडोक उच्छाद मांडून साजरा न करता दर्जेदार मनोरंजन आणि ज्ञान – कला वर्धनाने करायला हवा. श्री गणेशाची भक्ती आपल्या सगळ्यांना सुबुद्धी देवो,

आपल्या लाडक्या गणरायाचे सर्व भक्त दहा दिवस कोडकौतुक करतात. सार्वजनिक गणपतीचे तसेच असते. पूजा, मनोरंजन, उत्साह, खाण्यापिण्याची लयलूट यात भारतीय माणसांना अत्यंत आनंद मिळतो, दहा दिवस केलेल्या प्रचंड कष्टातून त्याला पुढचे वर्षभर जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. कोणी गणपतीला वेगळं काही मागत नाही, काही सांगत नाही. अनेकदा गणपती मंडपात अहोरात्र कष्ट करणारी मुलं, देवासमोर हात जोडायचे ही विसरून जातात. खरं तर त्याची गरजच नसते. देवाला आपल्या आयुष्यातला एक भाग, आपला मित्र,सखा मानणारी ही संस्कृती आहे. देवत्व देवत्व म्हणजे तरी वेगळं काय? कुठल्यातरी अज्ञात शक्तीकडून चांगलं जगण्याची ऊर्जा मिळवणे. हेच देवत्व…

श्री गणेश आपल्याला हेच वरदान दरवर्षी देतो, आपल्याला तृप्त करून, स्वतः तृप्त होऊन दहा दिवसांनी त्याचा भरभक्कम हात आपल्या मस्तकावर कायम राहो, याच शुभेच्छा !!

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *