खलिस्तान समर्थकांकडून इटलीत गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इटलीमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून बुधवारी(१२ जून) महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.खलिस्तानी समर्थकांनी गांधींच्या पुतळ्यावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा उल्लेखही केला आहे.विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी उद्या (१३ जून ) जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
इटलीच्या अपुलिया प्रदेशातील बोर्गो एग्नाझिया या लक्झरी रिसॉर्टमध्ये ही जी-७ शिखर परिषद पार पडणार आहे.१३ ते १५ जून दरम्यान शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यंदाची ५० वी शिखर परिषदत आहे.परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी उद्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या अपुलियाला जाणार आहेत.तत्पूर्वी खलिस्तानी समर्थकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे.
दरम्यान, पुतळ्याच्या विटंबनावर बोलताना परराष्ट्र सचिव म्हणाले की, महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या तोडफोडीचा मुद्दा इटलीसमोर ठेवण्यात आला.त्यानंतर पुतळ्याची दुरुस्तीही करण्यात आली आहे.तेथील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे, असे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले.दरम्यान, १३ जूनला होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या G7 भेटीदरम्यान या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होते. भारत आणि इटली यांच्यातील मजबूत संबंधांचे प्रतीक म्हणून या पुतळा उभारण्यात आला आहे. उद्गाटनापूर्वीच पुतळ्याची विटंबना झाल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘विक्रमी वेळेत’ हा परिसर स्वच्छ करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संरक्षण यंत्रणा सतर्क आहेत.
ML/ML/SL
12 June 2024