राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे तर्फे गांधी जयंती समारोह

पुणे, दि २
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे तर्फे आज दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम केंद्रीय संचार ब्यूरोच्या सहकार्याने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री प्रतापराव जाधव, माननीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (राज्य मंत्री), भारत सरकार होते.
मा. मंत्र्यांनी सर्वप्रथम संस्थानाच्या परिसरात उभारलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी संस्थेत स्थापन केलेल्या गांधी संग्रहालयाला भेट देऊन गांधीजींनी वापरलेल्या वस्तू व त्यांचे पत्र यांचे अवलोकन केले.
संस्थानाच्या संचालिका प्रा. (डॉ.) के. सत्यलक्ष्मी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले व संस्थेच्या कार्यकलापांची, उपचारात्मक सुविधा व संशोधन कार्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा देत सांगितले की महात्मा गांधींना प्राकृतिक चिकित्सा पद्धतीवर अपार विश्वास होता आणि ते आजीवन या पद्धतीचे प्रणेते राहिले.
या प्रसंगी आपल्या भाषणात मा. मंत्री श्री प्रतापराव जाधव म्हणाले की, महात्मा गांधी हे आयुष्यभर प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचे अनुयायी होते आणि त्यांनी नेहमीच देशवासीयांना या पद्धतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि जीवनमूल्यांचे अनुकरण करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. प्राकृतिक चिकित्सा ही फक्त उपचारपद्धती नसून एक अद्वितीय जीवनशैली आहे.
समारंभात मा. मंत्री महोदयांच्या हस्ते गांधीजींच्या विचारांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच केंद्रीय संचार ब्यूरोच्या कलाकारांनी सादर केलेल्या गांधीभजनाने उपस्थित वातावरण भारावून गेले.
यानंतर मा. मंत्र्यांनी आयुष मंत्रालयाने उभारलेल्या ‘निसर्गग्राम’ला भेट दिली. २५० खाटांचे हे आधुनिक रुग्णालय असून येथेच ‘लिव्हिंग गांधी मेमोरियल’चे उद्घाटन दीपप्रज्वलन करून व गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आले. यावेळी गांधी चरख्याद्वारे सूत कातण्याचे प्रात्यक्षिकही झाले. मा. मंत्री महोदयांनी स्वतः चरख्यावर सूत कातले व इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित केले.
यानंतर नक्षत्र उद्यानात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. पुढे त्यांनी निसर्गग्राम रुग्णालयातील उपलब्ध सुविधांची पाहणी केली तसेच पोषण महिन्यानिमित्त पोषण किटचे वितरण केले. यानंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.KK/ML/MS