एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप प्रणित, गजानन कीर्तीकर

मुंबई, दि 7
शिवसेना नेते आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर घणाघाती टीका करताना ती “भाजप प्रणित” असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन अखंड शिवसेना स्थापन करावी, तसेच एकनाथ शिंदे यांनीही त्यात सहभागी व्हावे, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना हवी,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कीर्तिकर यांनी ठाकरे बंधूंच्या एकीकरणाची गरज अधोरेखित केली. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाचे मोठे नुकसान झाले. सध्याची शिंदेंची शिवसेना भाजप प्रणित आहे, कारण ते एनडीएचा भाग आहेत. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस प्रणित आहे की नाही, हे स्पष्ट नाही,” असे कीर्तिकर म्हणाले.
कीर्तिकर यांनी शिंदे गटावर टीका करताना सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिसेल असे वाटत होते, पण तसे होताना दिसत नाही.” त्यांनी ठाकरे बंधू आणि शिंदे यांनी एकत्र येऊन बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना पुन्हा निर्माण करण्याचे आवाहन केले. “दोन्ही ठाकरे बंधू आणि शिंदे यांनी एकत्र येऊन अखंड शिवसेना स्थापन करावी, ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कीर्तिकर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील अंतर्गत मतभेद आणि ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या चर्चाना नव्याने बळ मिळाले आहे