अवकाळी पावसामुळे गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांची धांदल
वाशिम दि १६ : हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे वाशीम जिल्ह्यात गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पहायला मिळत आहे . पहाटेपासून वाशीम आणि कारंजा बाजारात समितीमध्ये गव्हाची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे .
हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू काढणी आणि विक्रीसाठी मोठी लगबग सुरू केली आहे. पावसामुळे तयार गव्हाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी शेतातून तातडीने गहू काढून बाजारात आणत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच वाशीमच्या कारंजा आणि वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतकरी आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अनेक शेतकरी रात्रीच गहू भरून बाजारात पोहोचले होते. सकाळ होताच गहू उतरविण्यासाठी आणि विक्रीसाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली.
हवामान बदलामुळे अचानक पाऊस झाल्यास शेतातील तयार गव्हाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे धोका टाळण्यासाठी शेतकरी काढणी करून तातडीने गहू विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे बाजारात आवक वाढली असून व्यापाऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणात माल येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली असून पुढील दोन-तीन दिवस बाजारात अशीच गर्दी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ML/ML/MS