तळेरे गगनबावडा घाट आठ दिवस वाहतुकीसाठी बंद

सिंधुदुर्ग दि ५ — सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी या महामार्गावरील गगनबावडा घाट येथे गुरुवारी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरड हटवण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले आहे. परंतु घाटात वरील बाजूला खडकांना उभे तडे गेले आहेत. त्यामुळे त्या खडकांचे सैलकरण करणे गरजेचे आहे. याकरता तज्ञांची समिती देखील बोलावली आहे.
यानंतर होणाऱ्या दुरुस्ती कामासाठी आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी 12 सप्टेंबर पर्यंत गगनबावडा घाट बंद राहील असा आदेश दिला आहे. तोपर्यंत पर्यायी फोंडाघाट तसेच भुईबावडा घाट मार्गे वाहतूक सुरू राहील . सुमारे वर्षभर तळेरे गगनबावडा घाट रस्त्याचे काम करून काही महिन्यापूर्वीच घाटातून वाहतूक सुरू झाली होती. गणेशोत्सव संपून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त परतीच्या प्रवासाला सध्या लागले आहेत. त्यात हा घाट बंद झाल्यामुळे काही जणांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ML/ML/MS