जगबुडीतील गाळ काढण्यासाठी अखेर पर्यावरण विभागाची मंजूरी
खेड, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खेड येथील जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी पर्यावरण विभागाची अंतिम परवानगी मिळाली असून, चार दिवसात प्रत्यक्षात या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार कदम म्हणाले, गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेमधून ९० लाखांच्या निधीची तरतूद जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी केली होती; परंतु हे काम सुरू होऊ शकले नाही. जुलैच्या पावसाळी अधिवेशनात नदीतील संपूर्ण गाळ काढण्यासाठी महायुती सरकारमार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि पहिला प्रश्न मार्गी लागला; परंतु पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या यासाठी आवश्यक होत्या. त्यासाठी पर्यावरण विभागाची एक केंद्रशासित कमिटी आहे. त्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाकडून नियुक्त केलेले अधिकारी असतात. या संदर्भात पर्यावरण सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते. त्यानंतर परवानगी दिली जाते. ही परवानगी मिळवण्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. याचे नकाशे चेन्नईवरून मिळण्यापासून त्यामध्ये काम करावे लागले. पर्यारवरण विभागाकडून जगबुडीचा गाळ काढण्यासाठी शेवटची परवानगी शिल्लक होती, ती मिळालेली आहे. पुढील काही दिवसात या बैठकीचे इतिवृत्त प्राप्त होतील. ते ऑनलाईन जाहीर केली जातात. त्यानंतर लगेचच जगबुडी नदीतील गाळ काढण्यास सुरवात होईल. हा गाळ काढताना शहराच्या समोरचा भाग किंवा फक्त मार्केटच्या समोरचा भाग नव्हे तर भरणेपासून म्हणजेच महामार्गापासून ते नारंगी नदीजवळील संगमापर्यंत गाळ काढण्यात येणार आहे.
ML/KA/PGB 20 Feb 2024