ज्येष्ठ लेखिका वीणा देव अनंतात विलिन

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा देव (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. वीणा देव या दिवंगत इतिहास अभ्यासक आणि लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर काल रात्री ९ च्या सुमारास पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्य संस्कार करण्यात आले.
गोनीदा यांच्यामुळे वीणा देव यांच्यावर घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे अध्यापन कार्य केले. विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. संपादन केली होती.
‘कधीकधी‘, ‘परतोनी पाहे‘, ‘स्त्रीरंग‘, ‘विभ्रम‘, ‘स्वान्सीचे दिवस‘ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर‘ या पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. राज्य शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार देण्यात आला.