फलाटांचे क्रमांक बदलण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून?

 फलाटांचे क्रमांक बदलण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून?

मुंबई दि ८ (शेखर जोशी ) : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकांचे नंबर बदलण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली? खरे तर आता या बदललेल्या क्रमांकांमुळेच प्रवाशांचा अधिक गोंधळ होणार आहे.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांच्या बदलण्यात आलेल्या क्रमांकांची उद्यापासून (९ डिसेंबर २३) होणार आहे. पश्चिम रेल्वे दादर स्थानक आणि मध्य रेल्वे दादर स्थानक स्वतंत्र असून दोन्ही फलाटांचे क्रमांक वेगवेगळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व प्रवाशांच्या ते अंगवळणी पडले आहेत, डोक्यात घट्ट बसले आहेत. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकात असलेल्या फलाटांच्या क्रमांकावरून प्रवाशांचा गोंधळ उडतो तो दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील सध्याच्या फलाटांचे क्रमांक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.

मध्य रेल्वेचा हाच दावा हास्यास्पद आहे. आमचा गोंधळ उडतो म्हणून क्रमांक बदला, अशी मागणी किती प्रवाशांनी केली होती? त्यांची संख्या किती? अशा किती टक्के प्रवाशांनी मागणी केली की मध्य रेल्वे प्रशासन त्याची दखल घेते? यामुळे उदघोषणा यंत्रणेसह मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांवरील क्रमांकांचे फलक, इंडिकेटर्स यातही बदल करावा लागणार आहे. त्याचा एकूण खर्च किती?

या बदलात पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचे १ ते ७ क्रमांक आहे तसेच राहणार आहेत. बदल मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक १ ते ८ मध्ये होणार आहे. घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता ९ डिसेंबरपासून मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांना ८ ते १४ असे क्रमांक देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वे वरील फलाट क्रमांक एक आता आठ असणार आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक दोन ज्या फलाटावरून डाऊन दिशेकरता ( कल्याण, कर्जत, कसारा) धिम्या लोकल सुटत होत्या तो फलाट सध्या कामासाठी बंद आहे त्यामुळे त्याला कोणताही क्रमांक देण्यात आलेला नाही. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक ३ आता ९, फलाट क्रमांक ४ आता १०, फलाट क्रमांक ५ आता ११, फलाट क्रमांक क्रमांक ६ आता १२, फलाट क्रमांक ७ आता १३ आणि फलाट क्रमांक ८ आता १४ या क्रमांकाचा असणार आहे.

मुळात पश्चिम रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानक आणि मध्य रेल्वेवरील दादर स्थानक यांच्या फलाटांचे क्रमांक वेगवेगळे आहेत. सर्व प्रवाशांना याची सवय झालेली आहे. तरीही सलग क्रमांक देण्याचा खटाटोप कशासाठी? सलग क्रमांक दिले की गोंधळ उडणार नाही? हे मध्य रेल्वे प्रशासनाने कशाच्या आधारावर ठरवले?

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *