देशभरातील सर्व शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करा -SC
नवी दिल्ली, दि. 30 : सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले. तसेच मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, अपंगांसाठी अनुकूल शौचालये बांधणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत.
हा निर्णय सामाजिक कार्यकर्त्या जया ठाकूर यांनी 2024 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान देण्यात आला. न्यायालयाने स्पष्ट केले की स्वतंत्र शौचालये नसणे हे संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन आहे, तर मासिक पाळीच्या काळात योग्य काळजी न मिळणे हे कलम 21 (जीवन आणि सन्मानाचा अधिकार) चे उल्लंघन ठरते.
याचिकेत नमूद करण्यात आले आहे की अनेक मुली मासिक पाळीच्या काळात शाळेत जात नाहीत, कारण त्यांच्या कुटुंबांकडे पॅडसाठी पैसे नसतात आणि शाळांमध्ये मोफत पॅड तसेच विल्हेवाट लावण्याची सुविधा उपलब्ध नसते. या कमतरतेमुळे मुलींच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
SL/ML/SL