शेतकऱ्यांची फसवणूक; हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात गोगलगाईंच्या उच्छादामुळे शेतकरी संकटात आहे. हा गोगलगाईंचा उच्छाद नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सरकारने पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंत्राटशाहीचा पुरस्कार करणारे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार का? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या असंतोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.
कापूस, सोयाबीनची उत्पादकांची सरकारकडून फसवणूक होत असून
कापसाचा दर्जा चांगला असताना 5400 रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे. केंद्र सरकारने कापसाला 2023-24 या हंगामात मध्यम धाग्यासाठी 6620 आणि लांब धाग्याला 7020 रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. परंतु, तो कागदावरच राहिला. सध्या हमी भावापेक्षा 1200 ते 1600 रुपये कमी दराने शेतकऱ्यांकडून कापूस घेतला जात आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक सरकारने थांबवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
सरकारचे याकडे लक्ष नाही
सोयाबीनची आधारभूत किमत प्रति क्विंटल 4600 रुपये आहे. पण आज आधारभूत किमतीपेक्षा 500 ते 700 रुपये कमी दर सोयाबीनला मिळत आहे. शेतकऱ्याच्या होणा-या या फसवणुकीकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारने हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करावी, तातडीने शासकीय खरेदी सुरु करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी
मराठवाड्यातील 55 हजार हेक्टर क्षेत्राला गोगलगाईंचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला असून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. सध्या शेतकरी मोठ्या संकटात आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ठोस मदत दिली पाहिजे. खरीपाबरोबर फळबागांनाही गोगलगाईंचा प्रादुर्भाव होत आहे. हा प्रादुर्भावर रोखण्यात सरकारला अपयश आले असून सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. Fraud of farmers; Buy at less than guaranteed price
फसव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे जगणे असह्य ?
नैसर्गिक आपत्ती, पिकावरील रोग, बोगस बियाणे, वाढलेला उत्पादन खर्च, हवामान बदल यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यात शेतमालाला हमी भावापेक्षा कमी दर आहे. सरकारच्या या फसव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा असा प्रश्न वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला आहे.
ML/KA/PGB
14 Oct 2023