फॉक्सकॉनने मोडला वेदांता बरोबरचा करार

 फॉक्सकॉनने मोडला वेदांता बरोबरचा करार

अहमदाबाद, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉने गुजरातमधील 19.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. या प्रोजेक्टवरून महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र आता गुजरात होऊ घातलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का बसला आहे. सेमीकंडक्टर उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीने भारतात सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वेदांतासोबत (Vedanta) केलेला करार मोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फॉक्सकॉनने याबाबत एक वृत्तपत्र निवेदन जारी केले आहे. वेदांतासोबत संयुक्त प्रकल्प न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फॉक्सकॉनने जाहीर केले आहे.

मागील वर्षी, अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीने फॉक्सकॉनसोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. वेदांता समूहाला सेमीकंडक्टर प्लांट लावण्यासाठी गुजरात सरकारकडून आर्थिक आणि बिगर-वित्तीय अनुदान देण्यात आले होते. यामध्ये स्वस्त दरात वीज आणि इतर बाबींचा समावेश होता.

दरम्यान, केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी वेदांतासोबतचा करार फॉक्सकॉनने मोडल्याने भारताच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावर परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रात येणार होता. सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, हा प्रकल्प गुजरातला अचानकपणे गेल्याने मोठं राजकारण गाजलं.

मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न न केल्याने केंद्राच्या मदतीने हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. तर, मविआ सरकार सत्तेवर असताना परवानगी आणि इतर बाबी रखडल्यानेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे शिवसेना शिंदे गट-भाजपने म्हटले.

SL/KA/SL

10 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *