फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलची कमाल; रुग्णाच्या मेंदूतील गाठ यशस्वीरित्या काढली!

 फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलची कमाल; रुग्णाच्या मेंदूतील गाठ यशस्वीरित्या काढली!

नवी मुंबई, दि ६ : वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. समीर काळे आणि त्यांच्या टीमने ६४ वर्षीय रुग्णाच्या मेंदूतील ‘स्फेनोइड विंग मेनिन्जिओमा’ नावाची मोठी गाठ काढून वैद्यकीय क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. या रुग्णाच्या मेंदूतून ७०० ग्रॅम स्फेनोइड विंग मेनिन्जिओमा गाठ काढण्यात आली. खारघर येथील ६४ वर्षीय रुग्ण गणेश यादव (नाव बदललेले आहे) यांच्या मेंदूमध्ये सुमारे ७०० ग्रॅम वजनाचा स्फेनॉइड विंग मेनिँजिओमाची मोठी गाठ आढळून आली होती.

गाठीबद्दल अज्ञात असलेल्या यादव यांना दहा वर्षांपासून वागणुकीत बदल, चिडचिड, विस्मरण, डोकेदुखी आणि मेंदूशी संबंधित त्रास होत होता. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूतील गाठी काढून टाकल्या. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे रुग्णाला मानसिक आणि शारिरीक त्रासातून मुक्तता मिळाली आणि त्यांना नवे जीवन मिळाले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून यादव दैनंदिन जीवनातील असंख्य अडचणींचा सामना करत होते. सतत होणारी डोकेदुखी, बोलताना अडखळणे, चेहरा वाकडा होणे यासह वागणूकीतही अनपेक्षित बदल झाला होता. लघवी आणि शौचावरील नियंत्रण सुटले होते. यादव यांना स्वतःहून दैनंदिन कामेही करता येत नव्हती. रोजच्या कामासाठी ते इतरांवर अवलंबून राहू लागले. सततची चीडचीड आणि बोलताना त्रास होत असल्याने त्यांचा कुटुंबातील सदस्यांशी संवाद तुटला. मानसिक तणावामुळे यादव यांना त्रास होत असल्याचे ग्राह्य धरले गेल्याने त्यांच्यावर मानसिक उपचार केले गेले. परिणामी, मूळ आजाराचे निदान होण्यास दिरंगाई झाल्याने ते योग्य उपचारांपासून दूरापास्त राहिले.

अखेरीस गणेश यादव यांनी नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी यादव यांच्यावर आवश्यक सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या. यादव यांच्या मेंदूच्या उजवीकडील पुढच्या भागात मोठी गाठ असल्याचे वैद्यकीय अहवालाअंती निष्पन्न झाले. ही गाठ मेंदूच्या इतर भागांवर मोठा दबाव निर्माण करत होती. मेंदू आपल्या मूळ जागेपासून ८.३ मिमी अंतरावर सरकला होता. वैद्यकीय भाषेत मेंदूतील या गाठीला स्फिनॉइड विंग मेनिन्जिओमा असे संबोधले जाते. मेंदूतील गाठ वाढत असल्या कारणाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

१९ नोव्हेंबर रोजी डॉ. काळे यांनी रुग्णावर बायफ्रंटल क्रॅनियोचटॉमी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या मेंदूतील सुमारे ७०० ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली. गाठीचा आकार मोठा असल्याने, मेंदूत इतर ठिकाणी गाठ तयार झाल्याने ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक मानली जात होती. अनुभवी डॉक्टरांच्या टीममुळे या शस्त्रक्रियेदरम्यान कोणताही गुंतागुंत निर्माण झाली नाही. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. गाठीचा आकार आणि स्थान लक्षात घेता रुग्णाच्या हाता-पायांमध्ये अशक्तपणा येण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कोणताही अशक्तपणा जाणवला नाही. त्याच्या शारिरीक हालचालींवरही दुष्परिणाम झाला नाही.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. २४ तासानंतर त्याचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी हे सर्व आरोग्याचे निकष सामान्य पातळीवर नोंदवले गेले. या काळात रुग्ण शुद्धीवर आल्याने जागरुक होता. रुग्ण डॉक्टरांच्या सूचनांनाही योग्य प्रतिसाद देत होता. रुग्णाकडून मिळणारा प्रतिसाद पाहता मेंदूच्या कार्यात कोणताही बिघाड झाला नसल्याने डॉक्टरांना दिलासा मिळाला.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची चीडचीड पूर्णपणे थांबली. वागणूकीतही समाधानकारक बदल दिसून आले. या बदलांमुळे रुग्ण आपले दैनंदिन आयुष्य पूर्वीप्रमाणे जगू शकला. त्याचे परावलंबित्वही कमी झाले. कुटुंबीयांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडली गेल्याने रुग्णाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे.

आपल्या वडिलांवर यशस्वी उपचार केल्याने रुग्णाच्या मुलाने डॉक्टरांसह संपूर्ण टीमचे आभार मानले. ‘‘फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी आमच्यासोबत ठामपणे उभे राहिले. त्यांची प्रत्येक टप्प्यावर साथ होती. आमच्या मनात सुरुवातीला या मोठ्या शस्त्रक्रियेबाबत साशंकता होती. मात्र डॉ. काळे यांनी आम्हांला अत्यंत सोप्या भाषेत आणि संयमाने वडिलांच्या आजाराबाबत माहिती दिली. या आजाराचे गांभीर्य आणि शस्त्रक्रियेचे महत्त्व समजावले. डॉ. काळे यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे आम्हांला योग्य निर्णय घेण्यास मदत झाली. त्यांनी या कठिण प्रसंगी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आम्हांला या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाताना त्यांची मोलाची मदत मिळाली. आज वडिलांना पुन्हा सामान्य जीवन जगता येत असल्याचे पाहून आम्हांला मनापासून आनंद होत आहे. याकरिता आम्ही डॉक्टरांचे सदैव ऋणी राहू.’’

२४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णाला कोणताही अशक्तपणा जाणवत नव्हता. रुग्ण स्वतःहून हालचाल करण्यास सक्षम होता. घरी नियमित फिजिओथेअरपी आणि हळूहळू शरीराची हालचाल करण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णाचा रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी हे सर्व आरोग्याचे निर्देशांक सामान्य पातळीवर नोंदवले गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नवी मुंबई येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. समीर काळे यांनीही या गुंतागुतीच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘७०० ग्रॅम वजनाइतका मोठा मेनिन्जिओमा यशस्वीरीत्या काढणे हे आमच्या सर्जिकल टीमचे कौशल्य आणि अचूकता दर्शवते. अशा केसेसमध्ये गाठीची लक्षणे ही मानसिक आरोग्याशी संबंधित असतात. त्यामुळे या आजाराचे वेळेवर अचूक निदान होणे महत्त्वाचे असते. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाच्या वर्तणूकीत आणि मानसिक आरोग्याशी संबंधित इतर बाबतीत सुधारणा दिसून आली. ही उल्लेखनीय आणि दुर्मिळ बाब समजली जाते. रुग्णाने वेळेवर प्रभावी उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होणे शक्य होते, हे या केसमधून स्पष्ट होते.’’

ही केस मेंदूशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांमध्ये तातडीने उपचार आणि योग्य निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करते. नवी मुंबईतील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल रुग्णांना उच्च दर्ज्याची आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्ण प्रथम या तत्त्वावर रुग्णांवर यशस्वी उपचार दिले जातात.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *