माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

 माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

अहमदनगर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संघर्षशील नेता असा परिचय असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ढाकणे हे न्यूमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यात त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस.एस.दीपक यांनी माध्यमांना दिली.

बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. गोवामुक्ती सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली होती. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या.
तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री होते.

जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. ऊस तोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी हात घातला.

दिवंगत ढाकणे यांना पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभा केला. दिवंगत ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

उद्या होणार अंत्यसंस्कार

दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक पर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (तालुका पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ML/KA/SL

27 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *