मनी लाँडरिंग प्रकरणी युको बॅंकेच्या माजी अध्यक्षांना अटक
 
					
    नवी दिल्ली,दि. १९ : मनी लाँडरिंग प्रकरणात युको बँकेचे माजी अध्यक्ष सुबोध कुमार गोयल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे. ED च्या तपासानुसार, युको बँकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गोयल यांनी Concast Steel & Power Ltd (CSPL) ला ₹६,२१०.७२ कोटींचे कर्ज मंजूर केले होते, जे नंतर गैरव्यवहार आणि आर्थिक अपहारासाठी वापरण्यात आले.
मंजूर केलेले कर्ज बँकेच्या नियमांचे उल्लंघन करत वितरित करण्यात आले होते. हे व्यवहार बनावट कंपन्या आणि गोयल यांच्याशी संबंधित व्यक्तींमार्फत करण्यात आले होते. रोख रक्कम, स्थावर मालमत्ता आणि लक्झरी वस्तूंच्या स्वरूपात गोयल यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप आहे.
ED ने गोयल यांच्या निवासस्थानी आणि संबंधित व्यक्तींच्या ठिकाणी २२ एप्रिल रोजी छापे टाकले, ज्यामध्ये गैरव्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. या अटकेमुळे बँकिंग क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंगविरोधातील कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. ED च्या तपासामुळे बँकिंग क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि आर्थिक अपहार उघडकीस येत आहेत, आणि यावर कठोर कारवाई केली जात आहे.
 
                             
                                     
                                    