पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी
इस्लामाबाद. दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सरकारने त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान यांच्यावर दंगल भडकवणे, लाच घेणे आणि देशाच्या प्रमुखपदी असताना मिळालेल्या भेटवस्तू विकण्याचा आरोप आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अताउल्ला तरार यांनी यांसदर्भात माहिती दिली. अताउल्ला तरार म्हणाले, ९ मे रोजी झालेल्या घटनांमध्ये माजी सत्ताधारी पक्षाचा सहभाग आणि पीटीआयच्या माजी किंवा सध्याच्या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर पाकिस्तानचा करार मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सध्या तुरुंगात आहेत. पाकिस्तानातील एका न्यायालयाने रविवारी इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टराचाराच्या नव्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आठ दिवसांच्या कोठडीसाठी भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. जिल्हा न्यायालायने शनिवारी या दोघांचीही गैर इस्लामिक विवाह प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र, लगेच एनएबीने त्यांना अटक केली.
पाकिस्तान तहरीक ए इन्साफ हा पाकिस्तानमधील एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना १९९६ मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर आणि राजकारणी इम्रान खान यांनी केली होती. त्यांनी २०१८-२०२२ पर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणूनही काम केले. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीबरोबर तीन प्रमुख पाकिस्तानी राजकीय पक्षांमध्ये पीटीआचा क्रमांक लागतो
SL/ML/SL
15 July 2024