पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

इस्लामाबाद, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. राष्ट्रीय तिजोरीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत. जानेवारी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या एका न्यायालयाने इम्रान खानला १४ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर राष्ट्रीय तिजोरीला ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टीट सेंट्रमशी संबंधित पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (PWA) ने पाकिस्तानमध्ये मानवी हक्क आणि लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी इम्रान खान यांच्या नामांकनाची घोषणा केली.
पार्टीट सेंटरमने रविवारी एक्स वर पोस्ट केले – पार्टीट सेंटरमच्या वतीने आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही, ज्यांना नामांकन करण्याचा अधिकार आहे त्यांच्यासह, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.
इम्रान खान यांना २०१९ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी २०१९ मध्ये हे नामांकन करण्यात आले होते. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी भारतासोबतचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगून त्यांच्या समर्थनार्थ पाकिस्तान संसदेत एक ठराव मांडण्यात आला.