पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना सुवर्णमंदीरात भांडी आणि शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा

चंदीगढ, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना शीखांच्या सर्वोच्च समिती असलेल्या अकाल तख्तने धार्मिक शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये तत्कालीन अकाली दलाच्या सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अकाल तख्तने सोमवारी (२ डिसेंबर) बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अकाल तख्तने दोन महिन्यांपूर्वी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना तन्खैया (धार्मिक बाबींमध्ये गुन्हेगार) म्हणून घोषित केले होते. शिक्षा सुनावताना अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी रघबीर सिंह यांनी बादल यांना सुवर्ण मंदिरातील भांडी धुण्याचे आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पंचसिंह साहेबांच्या घराबाहेर सकाळी एक तास सेवा देण्याचे कामही त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. अकाल तख्तने शिक्षा सुनावताना बादल यांना शिक्षेदरम्यान दररोज गुरुद्वारात कीर्तन ऐकण्याचे आदेश दिले आहेत.
अकाली दल सरकारच्या कार्यकाळात सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चुकीचे राजकीय निर्णय घेतल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. डेरा सच्चा सौदाचा गुरमीत राम रहीमला माफी दिल्याचा ही आरोप आहे. सुवर्ण मंदिरातील पंचसिंग साहिबांसमोर त्याने आपली चूक कबूल केली. सुखबीर सिंग बादल यांनी काही दिवसांपूर्वी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
SL/ML/SL
2 Dec. 2024