माजी सर न्यायाधीश चंद्रचूड या विद्यापीठातून शिकवणार कायद्याचे धडे

नवी दिल्ली, दि. १६ : भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची दिल्ली येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) मध्ये सुप्रतिष्ठ प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता धनंजय चंद्रचूड हे विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे देणार आहेत. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात एनएलयू विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं आहे की, “नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली येथे सुप्रतिष्ठ प्राध्यापक म्हणून भारताचे माजी सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तसेच या नॅशनल लॉ विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.”
कुलगुरू जी एस बाजपेयी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय काद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा क्षण ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुलगुरू जी एस बाजपेयी म्हणाले की, “भारतीय कायद्याच्या शिक्षणातील एक परिवर्तनकारी अध्याय म्हणून ही गोष्ट ठरणार आहे. जी कायदेतज्ज्ञांपैकी एक असलेले व्यक्ती कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या पुढच्या पिढीचं मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत.”
“धनंजय चंद्रचूड यांची उपस्थिती आपल्या शैक्षणिक संस्थेला समृद्ध करेल. आता विद्यापीठ एक केंद्र फॉर कॉन्स्टिट्यूशनल स्टडीज स्थापन करेल. त्या ठिकाणी धनंजय चंद्रचूड हे संशोधन कार्याचे नेतृत्व करतील”, असं कुलगुरू जी एस बाजपेयी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एनएलयू विद्यापीठ जुलै २०२५ पासून इन द स्पिरिट ऑफ जस्टिस, द डीवायसी डिस्टिंग्विश्ड लेक्चर सिरीज नावाची व्याख्यानमाला सुरू करण्याची योजना आखत आहे.
भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षे काम केल्यानंतर धनंजय चंद्रचूड नोव्हेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले. ते १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात रुजू झाले होते. त्यांच्या कारकिर्दीत अयोध्या जमीन वाद प्रकरण, गोपनीयतेच्या अधिकारावरील निर्णय, समलिंगी संबंधांना गुन्हेगारीमुक्त करणे आणि कलम ३७० वरील निर्णय अशा काही निर्णयांचा समावेश होता.