गोरगरीब घटकासाठी “ओबीसी बहुजन पार्टी ” ची स्थापना

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाचे कल्याण साधले जाणार नाही. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची सत्तेची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय व स्वतः राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. म्हणूनच ‘आपलीच मते, आपलाच पक्ष, आपलाच नेता आणि आपलीच सत्ता’ आणावयाची असेल, तर देशातील व राज्यातील या वर्गाला राजकीयदृष्ट्या संघटीत करण्याची व राजकीय सत्ता काबिज करण्याची गरज आहे. असे सांगत प्रकाश अण्णा शेडगे यांनी बुधवारी ” ओबीसी बहुजन पार्टी ” ची स्थापना करत पार्टीच्या नावाच्या फलकाचे अनावरण केले.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश शेंडगे बोलत होते , आता राजकीय व सामाजिक क्रांती घडविण्यासाठी ही पार्टी कार्यरत राहणार आहे. इतर पक्षातील विविध सेल च्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन शेंडगे यांनी यावेळी केले.
तुतारी वाजविणारा पुरुष हे चिन्ह प्राथमिक स्तरावर पार्टीला मिळणार आहे. लोकसभाच्या ४८ जागा आम्ही लढवणार आहोत, यवतमाळ , नांदेड , हिंगोली , माढा , बीड ,सांगली इतर मतदार संघात उमेदवार ठरले आहेत. आमची लढाई कोणत्याही रंगाशी , झेंड्याशी नसून माणुसकीची लढाई आहे. असे प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितले.
जरांगे यांची आता प्रकृती बिघडली आहे ,तरी त्यांनी त्यांचे उपोषण हे थांबवावे कारण तसे केल्यास मराठा समाजाला फायदा आहे.त्यांनी उभ केलेलं आंदोलनाचे नेतृत्व त्यांच्या हातात आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे.असे शेंडगे यांनी आवाहन केले.
यावेळी शेंडगे म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि कोणत्यातरी एका समाजाला झुकते माप देण्याची जी प्रवृत्ती सरकारची आहे ती चुकीची आहे . ७५-८० टक्के लोकसंख्येच्या मागासलेल्या वर्गाला सत्तेपासून दूर ठेवून केवळ स्वार्थासाठी त्यांच्या मतांचा वापर केला जात आहे . त्यामुळे वंचित वर्ग सर्वच बाबतीत वंचित राहिला आहे .
अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचे वादळ महाराष्ट्रात घोंगावत होते .आणि त्यांच्या दबावाला बळी पडून ओबीसी आरक्षण वर घाला घालण्याचे काम केले आणि त्याचे समर्थन या सरकारने केले. त्यामुळे ओबीसी समाज भयभीत झाला होता म्हणून पक्ष स्थापन केल्या शिवाय ओबीसी समाजाकडे पर्याय शिल्लक राहिला नव्हता .असे शेंडगे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस ओबीसी नेते प्रकाश शेंडगे,कुणबी समाज नेते चंद्रकांत बावकर , प्रा.पी.टी.मुंडे, जे.डी.तांडेल, मच्छिंद्र भोसले,दीपक म्हात्रे तसेच इतर ओबीसी सामाजाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
Formation of “OBC Bahujan Party” for the poor
ML/KA/PGB
14 Feb 2024