उत्तराखंडमधील जंगलाला भीषण आग

 उत्तराखंडमधील जंगलाला भीषण आग

नैनीताल, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील पर्यटकांना उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये आल्हाददायक शीतलतेचा अनुभव देणारे उत्तराखंड राज्यातील जंगल सध्या भीषण आगीच्या वेढ्यात होपरळून निघत आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे ही भयंकर आग नैसर्गिक नसुन मानवनिर्मित असल्याचे समोर आले आहे. काल जंगलात आग लावताना तिघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये काल आगीच्या 31 मोठ्या घटना घडल्या. यातील सर्वात मोठी घटना नैनितालमध्ये उघडकीस आली, जिथे आग हायकोर्ट कॉलनीच्या आसपास पोहोचली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. नैनितालच्या जंगलात लागलेली आग नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. चार दिवसांपासून धुमसत असलेल्या ज्वाळा नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस तसेच लष्कराचे जवानही प्रयत्न करत आहेत. हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणीही केली जात आहे. मात्र, आज उष्णतेमुळे ती दिवसेंदिवस तीव्र होत आहे. यावर्षी संपूर्ण उत्तराखंडमधील जंगलांमध्ये 575 घटनांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये सुमारे 690 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. त्यामुळे सुमारे 14 कोटी 41 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हेही जंगलातील आगीच्या घटनांबाबत गंभीर आहेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी अलीकडेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यासाठी डीएफओला देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, आगीच्या घटनांबाबत आज मुख्यमंत्र्यांनी दुपारी साडेतीन वाजता वन प्रशिक्षण अकादमीत बैठक बोलावली होती. आग विझविण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले.

काल हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरने भीमताल तलावातून पाणी भरून पंचायत क्षेत्रातील आगीवर नियंत्रण मिळवले. याआधीही 2019 आणि 2021 मध्ये आग लागल्यावर MI-17 हेलिकॉप्टर्सचा वापर त्यांना नियंत्रणासाठी करण्यात आला होता. आगीच्या धुरामुळे आसपासच्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

गढवाल विभागातील चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पौरी आणि टेहरी, डेहराडूनच्या जंगलात आग सतत नियंत्रणाबाहेर जात आहे. या भागात बहुतांशी पाइनची जंगले असल्याने उष्णतेमुळे आग झपाट्याने पसरत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सातत्याने प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी पाणी मिळत नाही. अशा ठिकाणी झाडांच्या फांद्या मारून आग विझविली जात आहे.

डोंगराळ भागात पाण्याअभावी आग आटोक्यात येत नाही दुसरीकडे कुमाऊं विभागातील नैनिताल, बागेश्वर, अल्मोडा आणि पिथौरागढ भागात जंगलाला आग लागण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे जंगले जळत आहेत. त्याचबरोबर वन्य प्राणीही ग्रामीण भागाकडे धाव घेत आहेत.

रुद्रप्रयागमध्ये आग लावणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी जंगलात आग लावताना तिघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. नरेश भट्ट, हेमंत सिंग आणि भगवती लाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आतापर्यंत जाळपोळ प्रकरणी एकूण 19 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 16 प्रकरणांचा तपास सुरू आहे.

SL/ML/SL

27 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *