लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी NDA आणि इंडिया आघाडी आमनेसामने

 लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी  NDA आणि इंडिया आघाडी आमनेसामने

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्तारुढ NDA कडून मागील लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’ चे काँग्रेस खासदार के. सुरेश रिंगणात आहेत. सुरेश यांनी अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक होणार असं स्पष्ट झालं आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती, त्यानंतर आणिबाणी नंतर अस्तित्वात आलेल्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपद निवडीसाठी निवडणूक होणार आहे.

दरम्यान 18 व्या लोकसभेत NDA कडं स्पष्ट बहुमत आहेत. वायएसआर काँग्रेसनंही बिर्ला यांना पाठिंबा जाहीर केलाय. आंध्र प्रदेशातील या पक्षाचे लोकसभेत चार खासदार आहेत. सत्तारुढ आघाडीचं वाढलेलं बळ आणि विरोधकांचे अनेक खासदार दिल्लीत नसल्यानं सुरेश ऐनवेळी अर्ज मागे घेतील, असं मानलं जात आहे.

दरम्यान लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरण्यास दहा मिनिटं बाकी असतानाच के. सुरेश यांनी अर्ज भरला. काँग्रेसच्या या निर्णयावर इंडिया आघाडीतील विसंवाद समोर आले. तृणमूल काँग्रेसनं या निर्णयाची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असं सांगितलंय. आम्हाला हा निर्णय टीव्हीवरच समजला असं तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितलं. तर आमच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. काँग्रेसनं या निर्णयाचं कारण आम्हाला समजावून सांगावं, असं पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याच्या बदल्यात लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. त्यावर सरकाकडून सकारात्मक आश्वासन न मिळाल्यानं के. सुरेश यांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला.

SL/ML/SL

25 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *