छ. संभाजी नगरमध्ये चारा छावणी सुरू

 छ. संभाजी नगरमध्ये चारा छावणी सुरू

छायाचित्र प्रातिनिधीक

छ. संभाजी नगर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० शीचा काटा पार केला आहे. राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. राज्यातील मराठवाडा विभागात पाणीप्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने शेतीचा पाणीपुरवठा कमी करण्यात आला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे राज्यातील पहिली चारा छावणी मराठवाड्यातील छ.संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे सुरू करण्यात आली आहे. आमदार प्रशांत बंब यांनी जिल्ह्यातील गंभीर होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ही चारा छावणी सुरू केली आहे. खोजेवाडी येथील या चारा छावणीत पहिल्याच दिवशी सुमारे ७०० जनावर येथे दाखल झाली आहेत. या चारा छावणीमुळे जिल्ह्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तर ही चारा छावणी राज्यातील पहिली ठरली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १३८ मोठ्या धरणांमध्ये आज उपयुक्त पाणीसाठा हा ३१.७३ शिल्लक राहिला आहे. तर सर्व २९९४ धरणांमध्ये ३२.६३ टक्के पाणी शिल्लक आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माहितीनुसार राज्यातील १८३४ गावे आणि ४४३४ वाड्यावस्त्यांना २३२० टँकरने पाणी पुरवले जात आहे.राज्यात गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका यंदा छ.संभाजी नगर जिल्ह्याला बसला आहे. येथील पैठणच्या जायकवाडी धरणात फक्त १४.२९ टक्के पाणी शिल्लक राहीले आहे. यामुळे हे पाणी सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. तर गरज पडेल तसे नियोजनानुसार शेतीसाठी आवर्तने सोडली जात आहे. पण पाण्याचीटंचाई यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्वाधिक टँकर हे मराठवाड्याला लागत असून मराठवाड्यात ११८३ टँकर फिरत असल्याची माहिती मंगळवारी विभागाने दिलेल्या माहितीवरून समोर येत आहे. मराठवाड्यातील फक्त हिंगोली जिल्हा वगळता इतर सात जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू आहेत. सर्वाधिक टँकर हे छ.संभाजी नगरमध्ये मागवले जात असून येथे ५२७ टँकर दररोज लागत आहेत. यावरून जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता समोर येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावरच निर्माण झालेली ही दुष्काळ सदृश स्थिती सावरण्यासाठी शासन सर्वतोपरिने प्रयत्न करत आहे. तरीही पावसाला अद्याप दीड महिन्यांहून अधिक काळ शिल्लक असताना या पाणी टंचाईचा सामना करताना यंत्रणांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काळजीपूर्व आणि नियोजनबद्धरित्या करावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

SL/ML/SL

17 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *