प्रमुख नद्यांना पूर – हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वाशीम दि १९:– वाशीम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील चार दिवसांपासून प्रमुख नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकं वाहून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील सर्व ४५ महसूल मंडळात मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यापैकी ११ महसूल मंडळात तीनपेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झाली आहे.
रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द परिसरात तब्बल चार वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील पैनगंगा, अडाण,अरुणावती, कांच आणि उतावळी नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील कवरदरी गावात काल सायंकाळी तलाव फुटल्याची घटना घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तलावातील पाणी शेतशिवारात शिरल्याने काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील रिसोड-मेहकर महामार्गा वरील वाकद गावाजवळ असणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून पूराचे पाणी वाहत असून वाहतूक खोळंबली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्प ८७ टक्के भरल्याने प्रकल्पाची ९ दारे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने अगोदरच धोक्याची पातळी गाठणाऱ्या पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग होत असून जिल्ह्यातील पश्चिम आणि दक्षिण भागात मुख्यता पैनगंगेच्या पात्रात लगत असलेल्या क्षेत्रात भीषण पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या सर्व पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.ML/ML/MS