पुराचे पाणी दुष्काळी भागासाठी पाणी, सिंचन योजनांचे पंप सुरू

सांगली, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यातील एकीकडे पश्चिम भागात नदीकाठ पूरस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पूर्व भागात पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे म्हैसाळ योजनेतील पाणी सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने आज म्हैसाळ योजनेचे दोन पंप सुरू केले आहेत.
म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्या साठी सोडण्यात आल आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्वच सिंचन योजनांची पंप सुरू करून दुष्काळी भागाला पाणी सोडावे असे आदेश सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले आहेत. दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी पुरवठा केला जातो. वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये या कारणासाठी जलसंपदा विभागाने जत,सांगोला या भागासाठी पाणी उपसा सुरू केला आहे.
जत,सांगोला भागातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होती त्यानुसार पाणी सोडले आहे. जसजशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.
ML/ML/SL
25 July 2024