सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी …
सातारा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. Five hundred acres agricultural industry in Satara
कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
पारंपरिक शेतीला अत्याधुनिक शेतीची जोड देत शेतकरी शेती करण्याबरोबर सेंद्रीय शेतीकडेही वळत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एन.डी.आर.एफ. च्या निकषात बदल करुन राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 750 कोटीच्या मदतीचे वाटप करण्यात आले . तसेच नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजाराची मदतही देण्यात आली.
जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांची जनावरे दगावले आहेत त्यांनाही शासनामार्फत मदत करण्यात येत आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त भरविण्यात आलेले कृषी प्रदर्शनाचे अत्यंत चांगल्या पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण तसेच प्रगतशील शेतकऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होणार आहे. शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक उन्नती साधावी. हीच खरी यशवंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली ठरेल, असेही मुख्यमत्री शिंदे यांनी सांगितले.
ML/KA/SL
25 Nov. 2022