कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळाले आंतरराष्ट्रीय मानांकन
मुंबई, दि. १३ : कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. यामुळे कोकणातील पर्यटन जगाच्या नकाशावर ठळकपणे आले आहे. या मानांकनामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली तालुक्यातील लाडघर या दोन किनाऱ्यांना हे मानांकन प्राप्त झाले आहे.
डेन्मार्क येथील एका संस्थेने ३३ कठोर गुणवत्ता निकषांची चाचणी घेतल्यानंतर हे मानांकन प्रदान केले आहे. यापूर्वी देशातील तेरा समुद्रकिनाऱ्यांकडे हे ब्लू फ्लॅग मानांकन होते, आता त्यात कोकणातील या पाच किनाऱ्यांची भर पडली आहे. पर्यावरण शिक्षण, जल गुणवत्ता आणि पर्यावरण व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा विचार करून हे मानांकन देण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटन वाढीस मोठा हातभार लागणार आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
SL/ML/SL 13 Oct. 2025