Fitness Dil Se – ‘फिट मुंबई’ अभियानाचा शुभारंभ
मुंबई, दि. २८ : बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयुक्त भूषण गगरानी, उपआयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा किल्ला या ऐतिहासिक परिसरात “फिट मुंबई” अभियानाची सुरुवात केली. “Fitness Dil Se!” ही या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवीन दिशा देत, नगरपालिकेने मुंबई कोस्टल रोड या स्थापत्य चमत्काराच्या किनारी जागतिक दर्जाचा सायकलिंग ट्रॅक आणि नयनरम्य रनिंग प्रोमेनेड अशी उत्कृष्ट सोयी निर्माण केल्या आहेत.
या अत्याधुनिक आणि प्रतीकात्मक अधोसंरचनेचा गौरव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि राज्यापासून राष्ट्र, तसेच स्थानिक ते जागतिक स्तरावर फिटनेसचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशाने एल अँड टी – बीएमसी कोस्टल रोड हाफ मॅराथॉन चे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या प्रतिष्ठित तत्वावधानाखाली पार पडणार असून, त्याचे व्यवस्थापन लोहा फाउंडेशन द्वारे केले जाणार आहे.
हा वार्षिक फिटनेस महोत्सव दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, आयोजित केला जाईल. याती पहिली आवृत्ती 14 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. तर चला — मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगातील नागरिकहो… या नव्या फिटनेसच्या पहाटेचे साक्षीदार बना! आरोग्य, ऐक्य आणि मानवतेच्या भावनेचा उत्सव साजरा करा…