देशात पहिल्यांदाच बनणार समुद्रातील वाऱ्यावर वीज
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील जैव इंधनाच्या तुडवडा लक्षात घेऊन केंद्र सरकार पर्यायी विज निर्मिती स्रोत उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत एका ऐतिहासिक निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. याबाबत बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील पहिल्या ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देऊन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हे 1GW चे ऑफशोर पवन प्रकल्प असतील, प्रत्येकी 500 MW (गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर). भारतासाठी मोठी संधी आहे.
दरम्यान आज केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील एका प्रकल्पासह ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी 7,453 कोटी रुपयांच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) योजनेला मंजुरी दिली. या योजनेत 1 गिगावॅट ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्प (गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर प्रत्येकी 500 मेगावॅट) स्थापित करण्यासाठी आणि चालू करण्यासाठी 6,853 कोटी रुपयांचा खर्च आणि दोन बंदरांच्या अपग्रेडेशनसाठी 600 कोटी रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे.
VGF योजना 2015 मध्ये अधिसूचित केलेल्या राष्ट्रीय ऑफशोर पवन ऊर्जा धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्याचा उद्देश भारताच्या अनन्य आर्थिक क्षेत्रात अस्तित्त्वात असलेल्या अफाट ऑफशोअर पवन ऊर्जा क्षमतेचा फायदा घेण्याच्या उद्देशाने आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
भारताला ७५१७ किमी लांबीची विशाल समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या नैसर्गिक स्रोताचा वापर करून उर्जा निर्मीती शक्य झाल्यास ऊर्जेसाठी स्वावलंबन मिळवण्यात देशाला यश मिळू शकेल. दरम्यान या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूकीची आणि कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी शाश्वत ऊर्जा निर्मितीमध्ये आत्याधुनिकता आणणे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे.
SL/ML/SL
19 June 2024