शहर सौंदर्यीकरण , स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

 शहर सौंदर्यीकरण , स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने काल मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्य शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत विजेते ठरलेल्या नागपूर महानगरपालिकेला पुरस्कार स्वरूपात १५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मुंबई येथील एनसीपीए सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मनपा आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये आयोजित शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेकरिता सुंदर जलाशय/पाणीसाठे, सुंदर हिरवे पट्टे/जागा, सुंदर पर्यटन/वारसा स्थळ, सुंदर बाजार/व्यावसायिक ठिकाण या चार बाबींवर मूल्यांकन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे, शहरातील तलाव, ऐतिहासिक स्थळे, वारसा स्थळे, शहरातील वृक्षआच्छादन असलेली स्थळे यासोबतच स्वच्छतेसंबंधी राबविण्यात येणारी प्रकल्प आदींची माहिती स्पर्धेद्वारे सादर केली.

याशिवाय जी-२० शिखर परिषदेच्या अनुषंगाने शहरात करण्यात आलेले सौंदर्यीकरण व निर्माण करण्यात आलेल्या सौंदर्यस्थळांची देखील माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली.

ML/KA/SL

21 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *