पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानला प्रथम “प्रभास पुरस्कार” घोषित

अमरावती, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दै. हिंदुस्थानच्या आधारवड प्रभा अरूण मराठे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त “प्रभास पुरस्कार”म्हणून दिला जाईल असे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे या वर्षीचा प्रथम पुरस्कार पळसखेड, ता. चिखली जिल्हा बुलढाणा येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला घोषित करण्यात आला आहे.
या सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संचालक डॉ. नंदकुमार आणि सौ. आरती पालवे हे गेल्या बारा वर्षांपासून करीत असलेल्या एका महान सेवाकार्याचा हा गौरव असणार आहे. या पुरस्काराचे रुपये २५००० (रुपये पंचेवीस हजार) रोख सहयोग राशी, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे स्वरुप आहे. हा पुरस्कार डॉ. नंदकुमार तथा आरती पालवे यांना समारंभपूर्वक योग्य दिवशी प्रदान केला जाणार आहे.
डॉ. नंदकुमार तथा आरती पालवे हे पळसखेड येथे मनोरुग्ण, मतीमंद बेघर लोकांकरीता एक आश्रम चालवितात. रस्त्यावर किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पडून घाणीत पडलेले अन्न खाताना एखादा मनोरूग्ण व्यक्ती आपल्याला दिसला तर आपण शक्य तेवढ्या लवकर त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. परंतू पालवे दांपत्य अश्या व्यक्तीला आपल्या आश्रमात घेऊन येते आणि त्याची उर्वरित आयुष्यभर सेवा करते. कुटुंबीयांनी अक्षरशः टाकून दिलेल्या किंवा हाकलून दिलेल्या २२० बेघर तसेच बेवारस स्त्री पुरुष मनोरुग्णांना येथे निवारा देण्यात आला आहे.
येथे यांच्यावर उपचार केले जातात, रोज जेवायला दिले जाते, त्यांच्या जखमांवर शुश्रुषा केली जाते, एवढेच नव्हे तर त्यांना लहान मुलाप्रमाणे सांभाळले देखील जाते. यामधील बरेच मनोरुग्ण बरे होतात. काहींच्या कुटुंबाचा पत्ता लागतो. परंतू दुर्दैवाने काही कुटुंबीय या बऱ्या झालेल्या आप्तास स्विकारण्यास नकार देतात. आपलेच लोक आपल्याला स्विकारत नाहीत हा त्या सुधारलेल्या रुग्णासाठी धक्का असतो. परंतू त्यालाही पालवे दांपत्य सांभाळतात. केवळ सांभाळतच नाही तर आता त्यांनी या अश्या बऱ्या झालेल्या रुग्णांना आश्रमाच्या कामामधे सामावून घेतले जाते.
यासोबतच त्यांच्याकरीता रोजगार निर्मितीचा देखील प्रयत्न आता सुरु करण्यात आला आहे. पळसाच्या पानांपासून द्रोण आणि प्लेट्स बनविण्याकरीता काही मशीन्स मदत स्वरुपात प्राप्त झाल्या आहेत. त्यावर हे मनोरुग्ण काम करत आहेत. सध्या मनोरुग्णांना स्वयंपूर्ण बनविण्याचा हा पायलट प्रोजेक्ट डॉ. नंदकुमार तथा आरती पालवे यांनी सुरु केला आहे. असे अनेक प्रोजेक्ट सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.
बेघर, बेवारस मनोरूग्णांची समाजातील स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामधे महिला असेल तर तिचे आणखी जास्त हाल होतात. परंतू अश्या मनोरुग्णांना मायेचे छत सेवा संकल्प प्रतिष्ठान देते आणि त्यांचे उर्वरीत आयुष्य समाधानाचे जाईल याबाबत काळजी घेते. डॉ. नंदकुमार यांच्या वडीलांनी आपली परंपरागत शेती या प्रतिष्ठानच्या नावे केली असून संपूर्ण परीवार या मनोरुग्णांसोबत राहून त्यांच्या सेवेमधे समर्पण करतो. असे थोर काम करणाऱ्या या संस्थेची निवड या पुरस्काराच्या निवड समितीने केली आहे.
डॉ. अविनाश मोहरील, अनंत कौलगीकर, पराग पांढरीपांडे, अनुराधा आळशी आणि प्रा. सावन देशमुख या पाच जणांच्या समितीने सर्वानुमते ही निवड केली ज्यास मराठे परिवाराने सहर्ष मान्यता देऊन सामाजिक सेवेकरीता प्रथम प्रभास पुरस्कार प्रभा मराठे यांच्या प्रथम स्मृतीदिनी पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान या संस्थेस घोषित केला आहे.
ML/KA/SL
27 Sept. 2023