देशात लवकरच धावणार पहिली LNG ट्रेन
अहमदाबाद, दि. ३१ : देशातील पहिली लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) वर चालणारी ट्रेन अहमदाबादला पोहोचली आहे. या हायटेक ट्रेनची खास गोष्ट अशी आहे की, ती एकदा पूर्ण भरलेल्या टाकीत 2200 किलोमीटरपर्यंतचे लांब अंतर कापण्यास सक्षम आहे. गुजरातच्या मेहसाणा आणि साबरमती विभागादरम्यान ट्रेनची चाचणी सुरू आहे. या ट्रेनने आतापर्यंत 2000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले आहे. येत्या काळात या विभागातील आणखी 8 ते 10 ट्रेन्समध्ये एलएनजी तंत्रज्ञान वापरण्याची योजना आहे.
यशस्वी चाचणीनंतर या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. या प्रकल्पांतर्गत, सुमारे 1400 हॉर्सपॉवर क्षमतेच्या गाड्यांना एलएनजी इंधन प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.
अहमदाबादचे डीआरएम वेद प्रकाश यांनी सांगितले की, एलएनजी डिझेलपेक्षा स्वस्त असल्याने ट्रेन चालवण्याचा एकूण खर्च कमी होतो. एलएनजी इंधनामुळे प्रदूषणातही मोठी घट होते.
कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि धुळीचे कण यांसारखे हानिकारक घटक कमी प्रमाणात तयार होतात. यामुळे रेल्वे ट्रॅकच्या आसपासची हवा देखील शुद्ध राहते. यासोबतच, इंधनाच्या खर्चातही बरीच बचत होते.
वेद प्रकाश यांनी पुढे सांगितले की, एलएनजी इंधन प्रणालीमुळे इंजिनच्या शक्तीत किंवा कार्यक्षमतेत कोणतीही घट होत नाही. इंजिनची विश्वसनीयता देखील डिझेल इंजिनसारखीच टिकून राहते.
एका एलएनजी टाकीतून डीपीसी ट्रेन सुमारे 2200 किलोमीटरपर्यंत धावू शकते, त्यामुळे वारंवार इंधन भरण्याची आवश्यकता नसते.