ही आहे शेअर बाजारात विक्रमी झेप घेणारी पहिली भारतीय कंपनी

 ही आहे शेअर बाजारात विक्रमी झेप घेणारी पहिली भारतीय कंपनी

मुंबई,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्रास रबर फॅक्ट्री म्हणजेच भारतातील सर्वात मोठी टायर निर्माता MRF कंपनीच्या शेअर्सनी इतिहास रचला आहे. MRF च्या शेअर्सनी काल (13 जून) ट्रेडिंग सत्रात एक लाख रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला. असे करणारी MRF ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे.

या शेअरने ट्रेडिंग सत्रादरम्यान इंट्राडे आणि 52 आठवड्यांचा उच्चांक रु 1,00,439.95 वर केला. मात्र, एमआरएफचे शेअर्स रु. 931.45 किंवा 0.94% ने वाढून रु. 99,900 वर बंद झाले. त्याचा शेअर ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला 99,150 रुपयांवर उघडला.एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी (12 जून) MRF स्टॉक 98,939.70 रुपयांवर बंद झाला होता.

गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका वर्षात स्टॉक 46% वाढला आहे. 17 जून 2022 रोजी MRF समभागांनी BSE वर 65,900.05 या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली होती.MRF कंपनीकडे एकूण 42,41,143 शेअर्स आहेत, त्यापैकी 30,60,312 शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत. तर 11,80,831 शेअर्स कंपनीच्या प्रवर्तकांकडे आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 42.37 हजार कोटी रुपये आहे.

चेन्नईस्थित एमआरएफ कंपनीचे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. या कंपनीने 1946 मध्ये खेळण्यांचे फुगे बनवून सुरुवात केली. 1960 पासून कंपनीने टायर बनवण्यास सुरुवात केली. आता ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे. एम मेमन मापिल्लई हे MRF चे संस्थापक आहेत. ते पूर्वी फुगे विकायचे. केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले मापिल्लई यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. सुरुवातीला मुलांसाठी खेळणी बनवणारी ही कंपनी 1956 पर्यंत त्यांची कंपनी रबर व्यवसायात मोठी कंपनी बनली होती. हळूहळू टायर उद्योगाकडे त्यांचा कल वाढला.

1960 मध्ये त्यांनी रबर आणि टायर्सची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. पुढे व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या मॅन्सफिल्ड टायर आणि रबर कंपनीशी करार केला. सन 1979 पर्यंत कंपनीचा व्यवसाय संपूर्ण भारतात आणि परदेशात पसरला होता. यानंतर अमेरिकन कंपनी मॅन्सफिल्डने एमआरएफमधील आपला हिस्सा विकला आणि कंपनीचे नाव एमआरएफ लिमिटेड असे ठेवले.

भारतातील टायर उद्योगाची बाजारपेठ सुमारे 60,000 कोटी रुपयांची आहे. JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि CEAT टायर्स हे MRF चे स्पर्धक आहेत. MRF चे भारतात 2,500 पेक्षा जास्त वितरक आहेत. इतकेच नाही तर कंपनी जगातील 75 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.
SL/KA/SL
14 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *