श्री साईबाबा संस्थानच्या आय बँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण

 श्री साईबाबा संस्थानच्या आय बँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण

अहिल्यानगर दि २९ — शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्‍याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया काल यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. या नेत्रदानाच्या माध्यमातून आज संस्थानच्या नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते आणि त्यांच्या टीमने कौशल्यपूर्वक नेत्ररोपण शस्त्रक्रिया पार पाडली. या ऐतिहासिक घटनेने संस्थानच्या आरोग्य सेवेत एक नवा अध्याय जोडला गेला आहे.
          
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर (IAS) यांच्या पुढाकाराने आणि चेन्नई येथील साईभक्त डॉ कोंडा संगीता रेड्डी यांच्या सहकार्याने संस्थानच्या रुग्णालयात अत्याधुनिक आय बँक स्थापन करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींना प्रकाश मिळणार आहे.
              
यशस्‍वी शस्‍त्रक्रियेनंतर काल साईनाथ रुग्णालयात या रुग्णाच्या हस्ते साई प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर  यांच्या हस्ते रुग्ण आणि सदर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तसेच त्यांच्या टीमचे सत्कार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक (नि.), प्र. उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. आहिरे, साईनाथ रुग्णालयाचे डॉ. अनघा विखे, डॉ. अक्षयकुमार साठे, डॉ गोविंद कलाटे, डॉ अशोक गावित्रे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, जनसंपर्क अधिकारी (रुग्णालये) सुरेश टोलमारे, प्र.अधिसेविका नजमा सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.  
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेत्रदानाबद्दल जनजागृती करून नेत्रदानाचे संकल्प करण्याचे आवाहन करून अधिकाधिक गरजू रुग्णांना दृष्टी मिळू शकेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *