या राज्यात सुरू होतय पहिलं AI विद्यापीठ
अमरावती, दि. १६ : आंध्र प्रदेश सरकारने देशातील पहिले AI विद्यापीठ उभारण्याचे ठरवले आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे १९ फेब्रुवारीला ‘AI’ विद्यापीठाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आंध्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान सचिव भास्कर कटमनेनी यांच्या मते, हे विद्यापीठ आयआयटी आणि आयआयआयटी यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. येथे केवळ पदवी शिक्षण नसेल, तर इयत्ता आठवीपासूनच AI मध्ये रुची आणि समज असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पीएचडीपर्यंतचे शिक्षण आणि शिष्यवृत्तीही दिली जाईल. २०२८ पर्यंत युनिव्हर्सिटी कार्यान्वित होईल आणि २०२९ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.येथे देशातील पहिले स्वदेशी लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) विकसित केले जाईल, जे भारतीय भाषा, संस्कृती आणि सामाजिक गरजांनुसार असेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून देश–विदेशातील सुमारे ५०० एआय स्टार्टअप्सना मदत केली जाईल. रतन टाटा इनोव्हेशन हबमार्फत विद्यार्थ्यांना थेट उद्योगाशी संबंधित प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आणि त्यासाठी नवीन एआय टूल्स याच ठिकाणी विकसित होतील.
जगातील आघाडीची संगणक चिप उत्पादक कंपनी एनवीडिया या प्रकल्पात आंध्र सरकारला मदत करत आहे. एनवीडिया केवळ तांत्रिक सहकार्यच करणार नाही, तर अभ्यासक्रमाची रचना, एआय कोर्स किट्सही विकसित करून देणार आहे. जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) आधारित संगणकीय संसाधनेही उपलब्ध करून दिली जातील. विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा आणि प्राध्यापक हे आंध्र सरकारकडून दिले जाणार आहेत. सध्या ६५ एकर क्षेत्रावर काम सुरू झाले आहे. पुढील टप्प्यात या प्रकल्पाशी एनवीडियासारख्या इतर एआय कंपन्याही जोडल्या जातील आणि संशोधन प्रयोगशाळा (रिसर्च लॅब्स) विकसित केल्या जातील.
SL/ML/SL