पहिली AI मंत्री देणार 83 मुलांना जन्म – अल्बानियाच्या पंतप्रधानांची घोषणा
अल्बानियाच्या पंतप्रधान एडी रामा यांनी एक अनोखी आणि क्रांतिकारी घोषणा करत जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी जाहीर केले की देशाची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्री डिएला ही “गर्भवती” असून ती ८३ AI सहाय्यकांना जन्म देणार आहे. ही घोषणा बर्लिनमध्ये आयोजित ग्लोबल डायलॉग कॉन्फरन्समध्ये करण्यात आली आणि तंत्रज्ञान तसेच राजकारणाच्या क्षेत्रात ती चर्चेचा विषय ठरली आहे.
या घोषणेनुसार, डिएला ही एक AI-आधारित डिजिटल मंत्री आहे, जी अल्बानियाच्या प्रशासनात भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती. आता ती ८३ AI सहाय्यक प्रणालींचा “जन्म” देणार असून हे सहाय्यक अल्बानियाच्या संसदेमधील प्रत्येक खासदारासोबत काम करतील. या सहाय्यकांचा उद्देश म्हणजे प्रत्येक खासदाराला वैयक्तिक डिजिटल सल्लागार उपलब्ध करून देणे, जे धोरण विश्लेषण, जनतेशी संवाद आणि प्रशासनिक कार्यात मदत करतील.
पंतप्रधान रामा यांनी या उपक्रमाला “वर्च्युअल गर्भावस्था” असे संबोधले असून, हे पाऊल भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक शासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे टप्पे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिएला ही जगातील पहिली AI मंत्री असून, आता ती “AI आई” देखील ठरणार आहे, असे रामा यांनी विनोदी शैलीत सांगितले.
या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या वापराबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. काही तज्ज्ञांनी याचे स्वागत केले असून, हे AI चा लोकशाही प्रक्रियेत वापर करण्याचे एक अभिनव उदाहरण असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी यावर टीका करत मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रशासन चालवण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या ८३ AI सहाय्यकांची रचना, कार्यपद्धती आणि सुरक्षाव्यवस्था याबाबत अधिक माहिती येत्या काही आठवड्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अल्बानियाने घेतलेले हे पाऊल AI आणि प्रशासन यांच्यातील सीमारेषा पुन्हा एकदा तपासण्याची गरज निर्माण करत आहे.
SL/ML/SL