कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा अग्नितांडव
लॉस एन्जलीस, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या आगीने कालपासून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा वणवा विझवणेही कठीण झाले आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रशासनाने काल पन्नास हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. लॉस एंजिलसच्या उत्तरेकडील डोंगरांवर ही आग झपाट्याने पसरली. त्यातच या भागात जोरदार वारे वाहात असल्याने ती पुन्हा शहरांकडे आली. या आधी लागलेले दोन मोठे वणवे अद्यापही भडकत आहेत. त्यांना विझवणे आता अशक्य झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
काल सकाळपासून ह्युजेस फायर या नावाचा वणवा पुन्हा भडकला. त्याने काही तासातच ३९ चौरस किलोमीटरचा भूभाग आपल्या ताब्यात घेतला. येथील झाडी झुडपं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून कास्टिल सरोवराच्या जवळ काळ्या धुरांचे लोट उठले आहेत. या भागात सलग तीन आठवड्यापासून हा वणवा पेटला आहे. ३१ हजारांहून अधिक लोकांना घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या भागातील पाच देशांतर्गत महामार्ग बंद करण्यात आले आहेत. अग्निशमन दल या आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून विमानांमधून रसायनांचा फवारा करुन आग पसरु नये याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शनिवारपासून या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात मदत होईल अशी अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, कॅस्टेक लेकजवळ ही आग विझवण्यासाठी 4 हजार अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. येथे ताशी 48 किमी वेगाने वारे वाहत आहेत. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, आग इतक्या वेगाने पसरत आहे की ती प्रत्येक 3 सेकंदाला फुटबॉल मैदानाएवढी जागा जाळत आहे.
उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:45 वाजता कॅस्टेक तलावाजवळ हॉटस्पॉट आढळून आले. यापूर्वी 7 जानेवारीला लॉस एंजेलिसच्या आसपासच्या दक्षिणेकडील जंगलात आग लागली होती. यामध्ये 25 जणांना आपला जीव गमवावा लागला.
SL/ML/SL
23 Jan. 2025