देशभरात फटाक्यांवर बंदी घालावी – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने देशभरात फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी करत प्रदूषणविरोधी धोरण सर्वत्र लागू करण्याची गरज अधोरेखित केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या समस्येवर सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी फक्त दिल्लीपुरतीच फटाक्यांवरील बंदी मर्यादित ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. “जर दिल्लीतील नागरिकांना स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा अधिकार आहे, तर इतर शहरांतील नागरिकांनाही तो मिळायला हवा,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
दिल्ली-एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्री, साठवणूक, वाहतूक आणि उत्पादनावर आधीच बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने विचारले की ही बंदी संपूर्ण देशात का लागू केली जात नाही. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे फटाके उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या संघटनांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी ग्रीन फटाक्यांना परवानगी देण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाने केंद्र सरकारकडे आणि पर्यावरण संस्थांकडे यावर स्पष्ट धोरण आणि मानके सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (NEERI) यावर संशोधन सुरू केले असून, पुढील सुनावणीला त्याचे निष्कर्ष सादर केले जाणार आहेत.