फिल्टर न करता पाण्‍याचा पुरवठा होत असल्‍याचे संदेश खोटे

 फिल्टर न करता पाण्‍याचा पुरवठा होत असल्‍याचे संदेश खोटे

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेपैकी जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्‍याने फिल्टर न करता पाण्‍याचा पुरवठा होत असल्‍याचे संदेश समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून हे संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. या अफवांवर मुंबईकरांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही पालिकेने केले आहेत . .पालिकेतर्फे मुंबईकरांना दररोज ४००० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करताना, जागतिक आरोग्‍य संघटना (WHO) आणि IS १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. एकूणच, मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो.

पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत पांजरापूर (१३६५ दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० दशलक्ष लीटर प्रतिदिन), विहार (१०० दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि तुळशी (१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) येथे पाणी शुद्धीकरणाकरिता आणले जाते. या पाण्‍यावर पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी), रॅपिड सँड फिल्टर्स, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर आदी प्रक्रिया केली जाते. त्‍यानंतर, शुद्ध पाणी मुंबईकरांना पुरवले जाते.

एकूणच मुंबईकरांना दररोज शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्‍यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या, दिशाभूल करणाऱया संदेशांपासून सावध राहावे, कोणत्‍याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

ML/ML/PGB 28 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *