एमपीएससी मधील रिक्त पदे भरणे अंतिम टप्प्यात
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती अंतिम टप्प्यात असून लवकरच ही तीन पदं भरली जातील अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत दिली. एमपीएससीतील तीन रिक्त पदांवरील सदस्यांच्या निवडीसाठी मुलाखती देखील पूर्ण झाल्या असून लवकरच मुख्यमंत्री याला मान्यता देतील असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अडीच लाख रिक्त पदं भरताना कंत्राटी पद्धत रद्द करावी आणि कायमस्वरूपी तत्वावर ही पद भर्ती करावी ही मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला शेलार उत्तर देत होते. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात रिक्त जागांवर भर्ती करण्याच्या दृष्टीनं परीक्षा आयोजित करण्यासाठी एमपीएससीकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि वेगानं भर्ती करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात येईल,असं शेलार यांनी सांगितलं. संबंधित विभागांनी आकृतीबंध तयार केल्यानंतर ही पदभर्ती केली जाईल असं ते म्हणाले.
ML/ML/SL
19 March 2025