वन उद्योगांसाठी आता एफआयडीसी
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात काल ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे आदी उपस्थित होते. *राज्यातील वनक्षेत्रात मोठी वाढ* महाराष्ट्रातील वन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नुकत्यात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. २ हजार ५५० वर्ग किलोमीटरचे वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे. कांदळवनांमध्येही १०२ वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कांदळवन संवर्धनाची संकल्पना देशभरात राबविण्याची घोषणा केली, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमात गौरवाने नमूद केले.
ML/KA/PGB