मिरजेतील तंतुवाद्यांना मिळणार जीआय टॅग …
सांगली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘तंतूवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतूवाद्यांना आता जीआय मानांकन मिळणार आहे. जीआय मानांकन मिळणारा तंतूवाद्य हा देशातील पहिलाच वाद्यप्रकार आहे. यामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळणार आहे.Fiber players in Miraj will get GI tag…
येथील वाद्यांची नक्कल आता कोणालाही करता येणार नाही. कॉपीराईटचा हक्क त्यांना प्राप्त होईल. वाद्यांच्या परदेशी निर्यातीला मोठा वाव मिळेल. जीएस म्युझिकल्सचे तंतूवाद्यनिर्माते अलताफ मुल्ला, झाकीर मुल्ला यांनी यासाठी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता.
मिरज शहर हे तंतूवाद्यनिर्मितीसाठी 170 वर्षाहून अधिक काळ प्रसिध्द आहे. शहरातील आद्य तंतूवाद्यनिर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांच्या अथक प्रयत्नातून पहिले तंतूवाद्य या शहरात बनले. त्यानंतर गेल्या शतकभरात तंतूवाद्याची मोठी बाजारपेठच येथे वसली आहे. देशात आणि देशाबाहेरही मोठय़ा प्रमाणात ही तंतूवाद्ये विक्री होतात. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत गायक-वादक येथून तंतूवाद्ये खरेदी करतात. अशा या तंतूवाद्यांना जीआय मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते.
जीआय मानांकन म्हणजे एखाद्या भौगोलिक परिसरात ज्या विशेष वस्तू, पिके, फळे, उत्पादने तयार होतात, त्यांच्या वाढीसाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी दिला जाणारा व्यापारी निर्देशांक आहे. यामुळे संबंधीत उत्पादित वस्तूंची अन्य कोणीही नक्कल करून ती वस्तू बनवू शकत नाहीत. मिरजेतील तंतूवाद्यनिर्मिती ही अशीच वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळे त्याला जीआय मानांकन मिळावे, असे प्रयत्न येथील तंतूवाद्य निर्माते करीत होते.
मिरजेतील जीएस म्युझिकल्सचे अलताफ मुल्ला, झाकीर मुल्ला आणि परवीन मुल्ला यांनी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येथील वाद्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे तंतूवाद्यांना जीआय मानांकन मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. जीआय मानांकनामुळे तंतूवाद्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे. येथील विशेष वाद्यांची नक्कल कोणीही करू शकणार नाही.
ML/KA/PGB
22 Jan. 2023