महिलेची हत्या केल्यास या देशात मारेकऱ्यांना जन्मठेप
रोम, दि. २९ : इटलीमध्ये एखाद्या महिलेची केवळ ती महिला आहे म्हणून हत्या केली गेली, तर तो एक वेगळा आणि गंभीर गुन्हा मानला जाईल. याला फेमिसाइड म्हणतात. इटलीच्या संसदेने नुकताच या संदर्भात एक कायदा मंजूर केला. सरकार आणि विरोधक दोघांनीही याला पाठिंबा दिला. या नवीन कायद्यानुसार, जर एखाद्या महिलेची तिच्या लिंगामुळे हत्या झाली, तर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल.
दोन वर्षांपूर्वी इटलीमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनी ज्युलिया चेकेटिनची तिच्या माजी प्रियकराने हत्या केली होती, कारण तिने त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता. यानंतर फेमिसाइडला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी होत होती. फेमिसाइड हा असा गुन्हा आहे, ज्यात एखाद्या स्त्रीची किंवा मुलीची हत्या केवळ ती स्त्री आहे म्हणून केली जाते. समाजात असलेल्या लैंगिक भेदभाव, हिंसा किंवा सत्तेच्या गैरवापरामुळे तिला दुर्बळ मानले जाते.
इटलीमध्ये हा कायदा आवश्यक ठरला, कारण गेल्या काही काळात महिलांवरील हल्ल्याच्या अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. 2023 मध्ये एका विद्यार्थिनीची तिच्या माजी प्रियकराने हत्या केली होती. त्याने तिला सुमारे 70 वेळा चाकूने भोसकले होते.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या की, त्यांना असा देश बनवायचा आहे जिथे कोणतीही महिला स्वतःला असुरक्षित किंवा एकटी समजू नये. मेक्सिको आणि चिलीसोबत इटली आता त्या निवडक देशांमध्ये सामील झाला आहे जिथे फेमिसाइडला (महिला हत्या) गुन्हा मानले जाते.
SL/ML/SL