दोन वर्षांपासून रखडली बार्टी, सारथी आणि महाज्योतीची फेलोशिप

मुंबई, दि. ३ : निधी वाटपाच्या नवनव्या योजना जाहीर करत असताना विद्यमान सरकारचे शैक्षणिक क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदींकडे दुर्लक्ष होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी); महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)तर्फे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप देण्यात येते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या संस्थांनी फेलोशिपसाठी जाहिरात प्रसिद्ध केली नाही. परिणामी संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक संकटात सापडले आहेत.
आता शासनाने फेलोशिपसाठी प्रत्येकी तिन्ही वर्षांसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करावी. तसेच फेलोशिपच्या पत्रासह निवड प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करून संशोधकांना तातडीने फेलोशिप द्यावी, असी मागणी संशोधक विद्यार्थ्यांकडून होत आहे.
महाज्योतीकडून ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थी, बार्टीकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी आणि सारथी संस्थेकडून मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते.