फेसबुक काढून टाकणार Like आणि comment बटण
मुंबई, दि. १२ : Facebook ने बाह्य वेबसाईट्सवरील Like आणि Comment बटण काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून हा बदल १० फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहे. मेटा कंपनीने जाहीर केले आहे की ब्लॉग्स, न्यूज पोर्टल्स, शॉपिंग वेबसाईट्स आणि इतर पानांवर एम्बेड केलेले फेसबुकचे Like आणि Comment प्लग-इन्स आता उपलब्ध राहणार नाहीत. हे बटण २०१० मध्ये सुरू करण्यात आले होते आणि त्या काळात इंटरनेटवरील सामग्री व्हायरल करण्यासाठी तसेच वाचकांचा सहभाग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत या प्लग-इन्सचा वापर सतत कमी होत गेला आहे.
मेटाने स्पष्ट केले आहे की हा बदल फक्त बाह्य वेबसाईट्सवर लागू होणार आहे. फेसबुकच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच अॅप किंवा वेबसाईटवर वापरकर्ते नेहमीप्रमाणे पोस्ट, फोटो, व्हिडिओ, रील्स यांना Like करू शकतील आणि कमेंटही करू शकतील. त्यामुळे फेसबुकच्या मूळ वापर अनुभवावर कोणताही परिणाम होणार नाही.
कंपनीने सांगितले की हा निर्णय डेव्हलपर टूल्स साधे आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. इंटरनेटवरील बदलते ट्रेंड्स, गोपनीयतेसंबंधी नवे नियम आणि वापरकर्त्यांच्या सवयी यांचा विचार करून हा पाऊल उचलण्यात आला आहे. या बदलानंतर वेबसाईट्सवरील जुने प्लग-इन्स तांत्रिक अडचणी निर्माण करणार नाहीत, ते फक्त दिसणार नाहीत.
या निर्णयामुळे अनेक प्रकाशक, ब्रँड्स आणि वेबसाईट्सना त्यांच्या वाचकांशी संवाद साधण्यासाठी नवे पर्याय शोधावे लागतील. सोशल शेअरिंगसाठी इतर प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात, १० फेब्रुवारी २०२६ पासून फेसबुकचे बाह्य Like आणि Comment बटण इतिहासजमा होणार आहे, मात्र फेसबुकच्या मूळ अॅप आणि वेबसाईटवरील वापरकर्त्यांचा अनुभव पूर्ववत राहील.
SL/ML/SL